रंग कंपनी एशियन पेंटने (Asian Paints) नुकतीच एक जाहिरात बनवली आहे. सध्या ही जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जाहिरातीद्वारे कोल्हापूरचा (Kolhapur) अपमान झाला आहे, शहराला हिणवले गेले असल्याचे, आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी म्हटले आहे. त्यासोबतच एशियन पेंटने ही जाहिरात तत्काळ मागे घेऊन कोल्हापूरकरांची माफी मागावी अशी इच्छा ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच सर्व टीव्ही चॅनेल्सनी ही जाहिरात प्रसारित करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
काय आहे ही जाहिरात –
या जाहिरातीमध्ये चिंटूच्या घराचे रंगकाम पाहून त्याचे मित्र, त्याला हे घर खूप चमकत असल्याचे सांगतात. त्यानंतर चिंटू घरातील दिवे चालू करतो, त्यानंतर घराचे रंगकाम पाहून त्याचे मित्र अजून आश्चर्यचकित होतात. ते त्याला म्हणतात की तुझ्याकडे बराच पैसा असेल, तु तर नक्की परदेशात फिरायला जाणार. त्यावर चिंटूदेखील आपण सिंगापूरला जाणार असल्याचे सांगतो. इतक्यात चिंटूचे वडील येतात व ते त्याला आपण सुट्टीमध्ये कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगतात. त्यावर चिंटूचे मित्र कोल्हापूरला जाणार असे म्हणत कुचेष्टेने हसतात.
ऋतुराज पाटील ट्वीट -
Every city carries its own traditional value and unique identity. We strongly condemn this shameful act by @asianpaints which has insulted our Great Kolhapur City by comparing it with a foreign city, to promote their commercial product.https://t.co/i1JwEyhNJX
— Ruturaj S. Patil (@ruturajdyp) August 25, 2020
अशाप्रकारे या जाहिरातीमधून कोल्हापूरला हिणवले गेले असल्याचे ऋतूराज पाटील यांचे म्हणणे आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘मी एशियन पेंट्स कंपनीला सूचना देत आहे की ही त्यांनी ही जाहिरात ताबडतोब काढून घ्या आणि त्यांनी कोल्हापुरावासीयांची माफी मागावी. सर्व टीव्ही चॅनेल्सना मी विनंती करतो की त्यांनी ही जाहिरात प्रसारित करू नये. जगातील अनेक नामांकित व्यक्ती या कोल्हापूरच्या मातीमधील आहेत. एशियन पेंट्सने ज्या प्रकारे कोल्हापूरला आपल्या जाहिरातीमधून हिणवले आहे, ते कदापि सहन केले जाणार नाही.’ (हेही वाचा: कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना व्हायरसची लागण)
ते पुढे म्हणतात, ‘आमच्या कोल्हापूरला देवी अंबाबाईंनी आशीर्वाद दिला आहे. कोल्हापूरला छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि इतर अनेक दिग्गजांचा वारसा लाभला आहे, ज्यांनी इतिहासाचा मार्ग घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे. प्रत्येक शहराची स्वतःचे पारंपारिक मुल्ये आणि अद्वितीय ओळख आहे. ज्यांनी आपल्या ग्रेट कोल्हापूर शहराची परदेशी शहराशी तुलना करून, त्यांच्या व्यावसायिक उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूरचा अपमान केला आहे अशा एशियन पेंटच्या या लज्जास्पद कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.’