Elections | (File Image)

पश्चिम महाराष्ट्रासह अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Vidhansabha Bypoll Elections 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (16 एप्रिल) आज पार पडते आहे. सकाळी आठ वाजलेपासून पोस्टल मतांपासून या मतमोजणीस सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाकडून जयश्री जाधव तर भाजपकडून सत्यजित कदम हे उमेदवार या वेळी रिंगणात आहेत. काँग्रेस आमदारांच्या निधनामुळे या ठिकाणी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला. प्रामुख्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. हे दोन्ही नेते कोल्हापूरचे असल्याने चुरस वाढली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक म्हणजे महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. दोन्ही बाजूंनी या निवडणुकीसाठी प्रचंड जोर लावण्यात आला होता. महाविकासआघाडीचे अनेक जेष्ठ आणि युवा नेते या वेळी प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातीलही भाजपचे प्रमुख नेते या निवडणुकीत प्रचारासाठी मोठ्या ताकदीने हजर असल्याचे पाहायला मिळाले.

प्रचाराची रणधुमाळी पाहता ही निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. त्यामुळे कोल्हापूरची जनता कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एक मात्र निश्चीत की, ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची लिटमस टेस्ट म्हणून ओळखली जात आहे.