राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार 'सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी माफी मागितली आहे. 'माझ चुकलं' असं म्हणत बंडातात्या कराडकर यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. तसेच, 'माझ्या बोलण्यावर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांच्याशी माझे फोनवर बोलणे झाले आहे. माझं जर चुकले असेल तर मी माफी मागण्यास तयार आहे. आपल्याकडून काही चुकीचे घडले असेल तर क्षमा मागण्यास काही कमीपणा नाही', असे म्हणत बंडातात्या कराडकर यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. या निर्णयावर अनेकांकडून टीका आणि विरोध होतो आहे. दरम्यान, सातारा येथे बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांची जीभ काहीशी घसरली. त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. (हेही वाचा, Bandatatya Karadkar On Supriya Sule: कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचे सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान, म्हणाले 'सिद्धही करुन दाखवू शकतो')
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी 'सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात', असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच, प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'होय, त्यांनी आव्हान स्वीकारावे आपण ते सिद्धही करु शकतो' असे म्हणत बंडातात्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थनही केले होते. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) वाईनबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.