कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी 'सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दारु पितात', असे वादग्रस्त विधान केले आहे. तसेच, प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'होय, त्यांनी आव्हान स्वीकारावे आपण ते सिद्धही करु शकतो' असे म्हणत बंडातात्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थनही केले आहे. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) वाईनबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. स्वत:ला किर्तनकार म्हणवतात मात्र दुसऱ्या बाजूला स्त्रीत्वाचे धिंडवडे काढता. त्यांना जाहीरित्या अपमानित करतात. केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी. असली विधाने खपवून घेतली जाणार नाही, असे कायदे यांनी म्हटले आहे. पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्यांना जाब विचारावा अशी मागणीही मनिषा कायंदे यांनी केली आहे. (हेही वाचा, Sharad Pawar Statement: शरद पवारांनी वाईन विक्रीवर केलेल्या वक्तव्यावर भाजपने दिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्यांना अयोग्य काही कळते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल)
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. आम्ही राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाला विरोध करतो. आम्ही त्या निर्णयाच्या विरोधातच आहोत. राज्यातील सर्व महिलाही राज्य सरकारच्या या धोरणाच्या विरोधात आहेत. असे असले तरी बंडातात्या कराडकर यांनी महिलांबाबत केलेले अशा पद्धतीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर विधानावर टीका करत म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या महिलांचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका करुन बंडातात्या कराडकर यांनी संबंध महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याबबत माफी मागावी, असेही त्या म्हणाल्या.