Dombivli Murder: चप्पलमुळे लागला महिलेच्या मारेकऱ्याचा शोध, डोंबिवली येथील घरात सोफा-कम-बेडमध्ये आढळला होता मृतदेह
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

डेंबिवली येथील दावडी परिसरात राहणाऱ्या वर्षीय सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) या 33 वर्षीय विवाहितेच्या हत्येमुळे (Dombivali Murder) एक खळबळ उडाली होती. सुप्रिया शिंदे यांचा मृतदेह राहत्या घरी सोफा कम बेडमध्ये आढळून आला होता. सुप्रिया यांचा पती कामाला आणि मुलगा शाळेत गेल्यानंतर ही घटना घडली होती. त्यामुळे मारेकऱ्याला शोधून काढण्याचे मोठेच आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, पोलिसांनी सापडलेल्या चपलांच्या आधारे मारेकऱ्याचा शोध घेतला आणि मारेकरी सापडला. धक्कादायक म्हणजे मारेकरी विशाल घावट हा सुप्रिया यांच्या शेजारीच राहात असे.

घटनेबाबत माहिती अशी की, सप्रिया शिंदे या आपला पती आणि मुलासोबत डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात असलेल्या ओम रेसिडेन्सी इमारतीत वास्तव्यास होत्या. त्यांचे पती नोकरी करतात. तर मुलगा शाळेत जातो. नेहमीप्रमाणे हे दोघेही घराबाहेर गेले होते. नेहमीच्या वेळी पती जेव्हा परत घरी आले तेव्हा पत्नी घरी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी घरात शोध घेतला पण त्या आढळून आल्या नाहीत. त्यांनी नातेवाकांना फोन लावला असता त्या कोणाकडेच गेल्या नव्हत्या. त्यामुळे अखेर सुप्रिया यांच्या पतीने मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, नातेवाईकांना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये आढळून आला. आरोपीने मागे कोणताही पुरावा सोडला नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. (हेही वाचा, Murder: डोंबिवलीत 33 वर्षीय महिलेची हत्या, मृतदेह पलंगामध्ये लपवून आरोपीचे पलायन, शोध सुरू)

दरम्यान, काही साक्षीदारांनी सांगितले की दाराच चप्पल आढळून आल्याचे सांगितले. पोलिसांनी चप्पलचे फोटो घेऊन शोध सुरु केला. त्यानंतर ही चप्पल शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची असल्याचे पुढे आले. पोलिसांनी विशाल घवट याला ताब्यात घेऊन तपास चौकशी केली असता त्याने आपणच हत्या केल्याचे सांगितले.

सुप्रिया यांना वाचनाचा छंद होता. त्यामुळे त्यांचा हाच छंद लक्षात घेऊन विशाल घवट हा पुस्तक देण्याच्या निमित्ताने सुप्रिया शिंदे यांच्या घरी आला. त्याने नेमकी सुप्रिया यांचा मुलगा आणि पती घरी नसल्याची वेळ साधली. घरात येताच त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया यांनी त्यास विरोध केल्याने त्याने सुप्रिया यांचे डोके भींतीवर आदळले. त्यानंतर त्यांचा घरातील टायने गळा आवळला आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह घरातील सोफा कम बेडमध्ये लपवून तो पसार झाला.