महाराष्ट्रात वाढत्या कोरोना वायरसच्या दहाशतीमुळे राज्यात आता मिनी लॉकडाऊनला आज (27 मार्च) पासून पुन्हा सुरूवात आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने (KDMC) शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता इतर सारी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र होळीच्या पार्श्वभूमीवर आज यामध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली मध्ये सर्व दुकाने बाजारपेठा सुरू राहणार आहेत.तर सोमवार म्हणजे 29 मार्च दिवशी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. होळी, रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभमीवर हा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून घेतल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. Night Curfew in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून रात्रीची जमावबंदी, रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान हॉटेल्स, मॉल्स, बगीचे, सिनेमागृहे राहणार बंद.
कल्याण डोंबिवली शहरामध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येला रोखण्यासाठी दुकानं, बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्याची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. पण पालिकेच्या या निर्णयाचा व्यापारी वर्गातून निषेध करण्यात आला. या निर्णयाविरूद्ध अनेक व्यापार्यांनी नाराजी व्यक्त करत पालिकेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन देखील केले होते. त्यामुळे पालिकेने देखील थोडी नरमाईची भूमिका घेत निर्बंधांमध्ये बदल केले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यानंतर रविवारी दुकानं सुरू असतील पण सोमवारी ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काल 24 तासांमध्ये 829 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यामध्ये एकूण झपाट्याने रूग्णसंख्या वाढत असली तरीही आता लसीकरणाची वेग वाढवण्याकडे प्रशासन लक्ष देत असल्याची माहिती समोर आली आहे.