Thane: कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वचं पोलिसांनी आपले कर्तव्य चौख पार पाडले. मात्र, यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. ठाणे शहरातील कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मृत पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते ठाणे पोलीस आयुक्तालयातील दिवंगत पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला 10 दिवसात प्रक्रिया राबवून पोलीस खात्यातील विविध पदावर नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, कोरोना संकटाच्या काळात पोलिस खात्याने योद्धा गमावला असला तरी पोलीस खात्याशी असलेली कुटुंबाची नाळ तुटता कामा नये. म्हणून कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर पोलीस सेवेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. (वाचा - Coronavirus Vaccine Update: सीरम इंस्टिट्युटची दुसरी लस Covovax जून मध्ये लॉन्च होण्याची शक्यता, आदर पूनवाला यांनी दिली महत्वाची माहिती)
कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसाला पोलिस विभागात नोकरी देण्याचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करणार असल्याचंही यावेळी हेमंत नगराळे यांनी सांगितलं. राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबई, ठाणे शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. यात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. ठाणे पोलीस हद्दीत कोरोनामुळे 34 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या कर्मचाऱ्यांच्या वारसदाराला पोलीस खात्यात नोकरीची संधी देण्यात आली आहे. लवकरचं हा निर्णय राज्यभरात लागू करण्यात येणार आहे.
मृत पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत मैदानात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.