
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडे असलेल्या खात्यांचा कारभार राष्ट्रवादीच्या इतर दोन मंत्र्यांकडे देण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अद्यापही त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या खात्यांचा कारभार आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या प्रस्तावात नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपविण्यात यावी असे म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नवाब मलिक यांच्याकडील मंत्रालयाचा कार्यभार इतर मंत्र्याकडे सोपविण्याची शफारस केली आहे. त्यानुसार राज्यपालांनी ही शिफारस मान्य करत कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविल्याचे समजते. (हेही वाचा, Jayant Patil On Nawab Malik: नवाब मलिक यांच्या अटकेमुळे धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठी जबाबदारी; शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वपूर्ण निर्णय)
नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा आणि जबाबदारीचा कार्यभार थांबून राहू नये. सर्वसामान्य जनतेची कामे व्हावीत या हेतून त्यांच्यावरील जबाबदारी इतर लोकांवर देण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी आगोदरच स्पष्ट केले होते. त्यानुसार मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी नरेंद्र राणे आणि राखी सावंत यांच्याकडे सोपविण्यातही आली. आता मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभारही इतर मंत्र्यांकडे सोपविण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी एक बैठक गुरुवारी रात्री उशीर पर्यंत पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत मलिक यांच्याकडील कार्यभार काढून इतर मंत्र्यांकडे देण्याबाबत निर्णय झाला. त्यामुळे नवबा मलिक सध्या बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत.