Jalgaon SBI Bank Robbery: जळगाव येथील एसबीआय बँकेत दरोडा; व्यवस्थापकावर कोयत्याने वार;  रोख 17 लाख रुपये, तीन कोटींचे दागिने आणि CCTV DVR पळवला
SBI | Twitter

जळगाव (Jalgaon) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत दिवसाढवळ्या दरोडा (Robbery) पडला आहे. दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकावर कोयत्याने वार केले आणि बँक कर्मचाऱ्यांनाही धमकावले. बँक व्यवस्थापनाने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी बँकेतील 17 लाख रुपये रोख रक्कम आणि सुमारे तीन कोटी रुपयांचे सोन्याचा ऐवज लुटून नेला. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेऱ्याचा डीव्हीआर सुद्धा सोबत चोरुन नेला. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, जळगावातील कालिका माता परिसरात असलेल्या काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरात एसबीआय कार्यालय आहे. 1 जून 2023 रोजी सकाळी नेहमीच्या वेळेत बँक उघडली तेव्हाच हा दरोडा पडला. साधारण सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बँक उघडली. बँक उघडल्यानंतर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये दोन हेल्मेटधारी तरुण बँकेत घुसले. त्यांनी शस्त्रांस्त्रांचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना धमकावले आणि व्यवस्थापकाच्या केबिनकडे धाव घेतली. त्यांनी व्यवस्थापक राहुल महाजन यांच्यावर चाकूने वार केले. या ते गंभीर जखमी झाले. त्यांनी महाजन यांच्याकडून लॉकरची चावी घेतली. दरोडेखोरांनी गोल्ड लोनसाठी बँक लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले सुमारे तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने आणि तब्बल 17 लाख रुपयांची रोखड मिळवली आणि ती सोबत घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, SBI Xpress Credit Personal Loan: आता फक्त एका Missed Call किंवा SMS वर मिळेल 20 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या पात्रता व अटी)

जळगाव येथील एसबीआय बँकेवर टाकण्यात आलेला दरोडा अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे. आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वकपणे बँकेत प्रवेश केला. आरोपींनी डोक्याला हेल्मेट घातले होते. जेणेकरुन चेहरा दिसू नये. इतकेच नव्हे तर मुद्देमाल चोरल्यानंतर आरोपींनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआरदेखील सोबत नेला. त्यामुळे आत अत्यंत नियोजनबद्ध टाकलेल्या दरोड्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.