Eknath Khadse on Devendra Fadnavis:  'विरोधी पक्ष नेता होतो पण असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही' एकनाथ खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी सुद्धा काम केले परंतू असा कुत्र्यामांजराचा खेळ कधीही केला नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसऱ्या बाजूला खडसे यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा सुरु होता तरीही केंद्र सरकारने निर्यात कायम ठेवली होती. केंद्र सरकारने देशातील राज्यांची गरज ओळखून जर वेळीच रेमडेसिवीर निर्यादीवर निर्बंध घातले असते तर महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असता असे खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा तेव्हा राज्य सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनी मिळून एकत्र काम केले. मग तो किल्लारी भूकंप असो किंवा राज्यात झालेली अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ. जवळपास सर्वच वेळा विरोधकांनी एकत्र येऊन काम केले होते. या इतिहासाला आज अपवाद होतो आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या पाठिशी ठामपणे उभा राहायचं सोडून हे सरकार कसे पडेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आपल्या पाठिमागचे कार्यकर्ते टीकून राहावेत यासाठी हे सरकार पडणार अशा तारखा देत आहेत. आताही त्यांनी हे सरकार दोन तारखेला पडेल असे म्हटले. आजवरच्या कोणत्याच तारखा यांच्या खऱ्या ठरल्या नाहीत. आता दिलेली तारीखही खरी ठरली नाही तर तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा चिमटाही खडसे यांनी या वळी काढला. (हेही वाचा, 'पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर', देवेंद्र फडणवीसांवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या संजय गायकवाडांवर नितेश राणे यांची जहरी टीका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगावमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उपस्थिती लावल्यानंतर एकनाथ खडसे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.