IRS Officer Sameer Wankhede: एनसीबीचे (Narcotics Control Bureau) माजी झोनल डायरेक्टर आणि सध्या डीजीटीएस (Directorate General of Taxpayer Services) विभागात कार्यरत असलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. वानखेडे महाराष्ट्रातून 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूकही लढवू शकतात, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. समीर वानखेडे यांनी नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयात अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली.
या भेटीनंतर त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. ते वाशिममधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवू शकतात, असंही म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत समीर वानखेडे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा -Aryan Khan Drug Case: NCB अधिकाऱ्यांनी माझा छळ केला; Sameer Wankhede चा दक्षता प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांच्यावर गंभीर आरोप)
समीर वानखेडे यांनी नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला पत्नी क्रांती रेडकर यांच्यासह भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. त्याच्या या भेटीनंतर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. समीर वानखेडे 2024 पूर्वी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि वाशिम शहरातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, NCB चे झोनल डायरेक्टर असताना समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. एवढेच नाही तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणादरम्यान ड्रग्जची अनेक प्रकरणे उघड करून समीर वानखेडेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेने आपल्या कार्यकाळात अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते. त्यांनी दाऊदच्या अनेक गुंडांना अटक केली होती.