India-China Clash: भारत 'मजबूत' आहे 'मजबूर' नाही, ‘आँखे निकालकर हात मे देना’; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- ANI)

India-China Clash: भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आदी पक्षाचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, 'भारताला शांतता हवी आहे. याचा अर्थ असा नाही की, भारत कमकुवत आहे. चीनचा स्वभाव मुळात विश्वासघातकी आहे. भारत 'मजबूत' आहे 'मजबूर' नाही. केंद्र सरकार चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यास सक्षम आहे. ‘आँखे निकालकर हात मे देना’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी चीनविरोधात घेतली आहे. (हेही वाचा - India-China Clash: पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारला शिवसेनेचा टोला, 'पंडित नेहरु यांना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल')

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'आम्ही सगळे सैनिकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत,' अशी ग्वाहीदेखील दिली आहे. यावेळी शरद पवार यांनी गलवानमध्ये जे काही घडलं ते क्लेशदायक आहे. या संवेदनशील प्रकरणांकडे तशाचं पद्धतीने पाहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारला अनेक सवाल केले. केंद्र सरकारने ही बैठक सर्वात आधी बोलवायला हवी होती. चीन आपल्या हद्दीत किती घुसलं आहे, याची माहिती सरकारने द्यावी. तसेच चीनच्या या कारवाईबाबत देशाला काहीच माहिती मिळत नाही, हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणायचं का? असा प्रश्नही यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे.