येत्या 15 नोव्हेंबर रोजी आयसीसी विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी (IND vs NZ) होणार आहे. ही लढत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या विश्वचषकात भारताने आतापर्यंत 9 सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. आता टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव करून न्यूझीलंडने भारताला स्पर्धेतून बाहेर केले होते. आता भारत त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे. म्हणूनच भारतीय चाहत्यांसाठीदेखील हा सामना महत्वाचा आहे.
अहवालानुसार, या सामन्यासाठी चाहते मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली आहे. या सामन्याची तिकिटे आणि हॉटेलमध्ये खोली मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरु आहे. या विश्वचषकामुळे देशभरात व्यवसाय तेजीत आहे आणि मुंबईतील हॉटेल्सही या संधीचा फायदा घेत आहेत. दिवाळीच्या सणानंतर होत असलेल्या या सामन्यामुळे विक्री वाढण्यास नक्कीच मदत होईल.
या सामन्यामुळे शहरातील हॉटेलचे दर जवळपास 80% वाढले आहेत. नरिमन पॉइंट येथील ओबेरॉय सारख्या पंचतारांकित हॉटेलमधील सूटचे भाडे 90,000 हजारपर्यंत गेले आहे. बुकिंग पोर्टलनुसार, ट्रायडेंट हॉटेलचे दर 14 नोव्हेंबरपासून 32,000 पासून सुरू होत आहेत. ओबेरॉय आणि ट्रायडंट हे दोन्ही 15 नोव्हेंबरच्या उपांत्य फेरीचे ठिकाण असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या सर्वात जवळचे पंचतारांकित पर्याय आहेत.
कुलाब्यातील ताजमहाल पॅलेस सारख्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये 14 नोव्हेंबर रोजी बेस श्रेणीच्या खोलीसाठी 56,000 र्य्पये भाडे आकारले जात आहे, तर शेजारील ताजमहाल टॉवर त्यासाठी 41,300 मागत आहे. विमानतळाजवळील ताज सांताक्रूझ येथे 14-15 नोव्हेंबर या कालावधीत पंचतारांकित हॉटेल्समध्ये 19,000-20,000 रुपये प्रति रात्र खोल्या आहेत. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचा सरासरी रुम दर सध्या प्रति रात्र सुमारे 15,000-16,000 इतका आहे. दुसरीकडे, उपांत्य फेरीदरम्यान दोन आणि तीन-तारांकित हॉटेल्सनी त्यांच्या किमती 3,000-10,000 वरून अंदाजे 5,000-18,000 प्रति रात्र वाढवल्या आहेत. (हेही वाचा: India Beat Netherlands: भारतीय संघाने दिवाळीत दिली विजयाची भेट, गटातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी केला पराभव)
दरम्यान, वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल मॅचसाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली आहे. टीम इंडिया सोमवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. भारतीय संघ मुंबईत पोहोचल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये टीमचा कर्णधार रोहित शर्मा त्याची मुलगी आणि पत्नी रितिका सजदेहसोबत दिसत आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शुभमन गिल देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.