राज ठाकरे यांचा मनसे घेऊ शकतो गगनभरारी पण त्यासाठी करावे लागतील हे उपाय
Raj Thackeray | (Photo credit : Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) . अर्थातच राज ठाकरे (Raj Thackeray) या एकाच चेहऱ्यावर गर्दी खेचणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दुर्लक्ष न करता येणारा राजकीय पक्ष. गेली अनेक वर्षे हा पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवर मांड ठोकण्यासाठी निकराने प्रयत्न करत आहे. त्याला अपेक्षीत यश मिळताना दिसत नाही. पक्षस्थापनेनंतर अगदी पहिल्याच विधानसभा निवडणूकीत निवडूण आलेल्या 13 आमदारांचा अपवाद वगळता या पक्षाला पुढे हे सातत्य राखता आले नाही. विधानसभा निवडणूक 2014, 2019 मध्येही या पक्षाला अपेक्षीत यश मिळाले नाही. या दोन्ही निवडणुकांमध्ये या पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. परंतू, असे असले तरी, मनसेचा भविष्यकाळ उज्जवल ठरु शकतो. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारीही हेच सांगते. पण, त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत पक्षाच्या धुरीणांना काही महत्त्वाचे बदल करावेल लागतील.

जनसंपर्क

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राजू रतन पाटील यांच्या रुपात मनसेचा एकच उमेदवार निवडूण आला. त्यामुळे राजकारणातील आकड्यांच्या खेळात मनसे उठून दिसत नाही. पण, मतांच्या आणि मतविभागणीच्या दृष्टीने विचार करता एकूण 15 विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी दमदार कामगिरी केली. मनसेने लढलेल्या एकूण जागांपैकी 9 जागांवर मनसे उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. तर, 6 मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. याचाच अर्थ असा की, मनसे उमेदवाराने विजयी उमेदवाराला निकराची झुंज दिली. ज्या ज्या मतदारसंघात मनसे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्या मतदारसंघात मनसेने थोडा अधिक जोर लावत जनसंपर्क वाढवला असता तर, चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. राजकारणात प्रत्येक लढाई ही नवी असते. त्यामुळे यापुढे मनसेला आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करावे लागतील हे नक्की.

दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेले मनसेचे उमेदवार

मंदार हळबे - 45000 (डोंबिवली)

अविनाश जाधव - 73000 (ठाणे)

संदीप देशपांडे - 42600 (दादर, माहीम)

नयन कदम - 41000 (मागाठाणे)

संदीप जळगावकर - 42000 (भांडुप प.)

हर्षला चव्हाण - 29000 (मुलुंड प.)

किशोर शिंदे - 79000 (कोथरुड)

संतोष नलावडे - 38400 (शिवडी)

शुभांगी गोवरी - 39000 (भिवंडी ग्रामीण)

राजकीय व्यवस्थापन

सहा मतदारसंघ असे आहेत की, ज्यामध्ये मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राजकीय विश्लेषक सांगतात की, ज्या ठिकाणी मनसे तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा ठिकाणी मनसेने अधिक व्यापक प्रमाणात राजकीय व्यवस्थापन करणेय गरजेचे आहे. जेणेकरुन मूळ आणि आताच्या निवडणुकीत नव्याने जोडला गेलेला मतदार मनसेसोबत कायम राहिली. तसेच, पुढच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षीत यश गाठण्यात यश मिळू शकेल. (हेही वाचा, राज ठाकरे यांनी प्रचारात केला असता 'हा' बदल तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळवले असते घवघवीत यश)

तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेले मनसेचे उमेदवार

वीरेंद्र जाधव - 26700 (गोरेगाव)

प्रकाश भोईर - 4000 (कल्याण प.)

गजानन काळे - 27600 (बेलापूर)

अरूण सुर्वे - 25800 (दिंडोशी)

निलेश बाणखेळे - 22800 (ऐरोली)

रमेश राजूरकर - 32000 (वरोरा)

चेहऱ्याचा प्रभावी वापर

राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि चेहरा हे मनसेची सर्वात शक्तीमान बाजू. राज ठाकरे यांचे नेतृत्व हे सडेतोड आहे. अचूक निशाणा थेट बाणा हाच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कणा आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेला विशेष असे काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. परंतू, राज ठाकरे हे केवळ निवडणुकीच्या काळातच सभांवर भर देतात असे दिसते. तसे, न होता काही महिन्यांच्या फरकाने पक्षाचे मेळावे पुन्हा पुन्हा आयोजित करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा. या संवादाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या चेहऱ्याचा खुबीने वापर करत जनतेपर्यंत पोहोचायला हवे.

पक्षनिधीच्या रुपात आर्थिक रसद

कोणत्याही पक्षासाठी राजकीय ताकद निर्माण करण्यासाठई आर्थिक रसद महत्त्वाची. त्यासाठी पक्षनिधी महत्त्वाचा. सत्तेत नसताना आणि राजकीयदृष्ट्याही फारशी ताकद नसताना पक्षनिधी उभारणे हे राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अडचणीचे. मनसेला निवडणूक लढवत असताना पक्षनिधीचा फटका बसला असण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षाला भक्कम उभारी मिळवून देण्यासाठी मनसेला मोठ्या प्रमाणावर पक्षनिधी उभारावा लागेल.

कार्यकर्त्यांचे जाळे

गेली अनेक वर्षे पक्षाला सत्तेत स्थान न मिळाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रेरित करावे लागेल. त्यासाठी विभागवार विविध कार्यक्रम आयोजित करुन कार्यकर्त्याला सतत कार्यमग्न ठेवावेल लागेल. कोणत्याही राजकीय पक्षासाठी काळ खडतर असू शकतो, पण कष्टाच्या जोरावर त्यावर नक्की मात करता येऊ शकते. त्यामुळे येणारा काळ मनसेसाठी उज्ज्वल ठरु शकतो. मात्र, मनसेला त्यासाठी जाणीवरपूर्वक प्रयत्न करावे लागतील हे नक्की.