कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीची जनतेला माहिती करुन देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. या लाईव्हमधील मुख्यमंत्र्यांची विधानांवर आक्षेप घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही मुद्द्यांवर सवाल केले आहेत. "कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार" असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होती, असे मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं, पण त्या लाटेचा सामना करण्यासाठी मधल्या पाच महिन्यात राज्य सरकारनं काय तयारी केली हे सांगितले नाही. रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत व ते काही दिवसात सुरू होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण "हा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे" असे चंद्रकांत पाटील म्हणाले.हेदेखील वाचा- केंद्र आणि राज्याच्या blame game मध्ये जनतेचाच game होतोय- मनसे नेते संदीप देशपांडे

"मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती, तर गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते, तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती. शुक्रवारच्या संबोधनात त्यांनी केंद्राने ऑक्सिजनचा पाचशे मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केलं ते बरं झालं. राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी मान्य केले हे सुद्धा चांगले झालं," असं पाटील म्हणाले.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, करोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. करोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?," असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

"राज्यात लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढविल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या रोजगाराचे नुकसान होणार आहे, ते ध्यानात घेता मुख्यमंत्री शुक्रवारी काही वाढीव पॅकेज जाहीर करतील, असं वाटलं होतं पण त्यांनी निराशा केली. आधीच्या पॅकेजच्या अंमलबजावणीची त्यांनी दिलेली माहितीसुद्धा समाधानकारक नाही," अशी टीका पाटील यांनी केली.