काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NArendra Modi) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर देताना, भारतीय जनता पक्ष (BJP) पुणे अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी पटोले यांच्या विरोधात अत्यंत गंभीर अपशब्द वापरले आहेत. काल मुळीक यांनी ट्विट केले होते की, ‘नाना पटोले म्हणजे पिसाळलेला कुत्रा. बऱ्याच वेळा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करावे असे म्हणतात पण जर कुत्रा पिसाळलाच तर दांडक्या शिवाय पर्याय नाही.’ त्यानंतर आज पुण्यात आंदोलन करता असताना मुळीक यांनी, 'संधी मिळाली तर नाना पटोले यांना चपलेने मारू', असे वक्तव्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला होता. मात्र यावर स्पष्टीकरण देताना, आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो असे पटोले यांनी सांगितले. पुढे, ‘ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते’ असेही नाना पटोले म्हणाले होते. आता पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली असून, राज्यभरात आंदोलने केली जात आहे.
आज पुण्यात बोलताना मुळीक म्हणाले, ‘नाना पटोले यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय निंदनीय शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्राच्या भूमीत असे वक्तव्य कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही. याचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पुण्यात आंदोलन करत आहेत. मोदींच्याबद्दल भाष्य करून प्रकाशझोतात येण्याचा नाना पटोले यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यामुळे जी काही कॉंग्रेस देशात उरली आहे ती देखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आज आम्ही नाना पटोले यांच्या प्रतिमेला चपलेने मारणार आहोत, मात्र संधी मिळाली तर भाजपचे कार्यकर्ते नाना पटोले यांची अशीच हालत करतील.’
दुसरीकडे, नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.