हुंड्यासाठी महिलांचा छळ होत असल्याच्या अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. मात्र हुंडा (dowry) मिळत नसल्याने डॉक्टर पतीने एक अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी हुंडा आणत नसल्याने एका डॉक्टर पतीने चक्क पत्नीच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू (HIV Virus) सोडल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpari Chichwad) येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह सासू-सासऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2015 मध्ये या महिलेचा विवाह झाला होता. लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ सुरु केला. सतत पैशांची मागणी करु लागले. मात्र तरीही हुंडा मिळत नसल्याने पतीने महिलेवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
त्यानंतर आजारी असताना पतीने शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत असून महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे.