हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun Rich List 2023) मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थने नुकतीच ‘इंडिया रिच लिस्ट 2023’ जारी केली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही 12वी वार्षिक रँकिंग आहे. महत्वाचे म्हणजे या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक महाराष्ट्रात राहतात, त्यानंतर दिल्ली आणि गुजरातचा नंबर लागतो.
30 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्रात 391 अतिश्रीमंत आहेत. राजधानी दिल्लीत 199 श्रीमंत लोक राहतात. दिल्लीतील अतिश्रीमंतांकडे 16,59,500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत एचसीएलचे शिव नाडर आहेत, ज्यांची मालमत्ता 2,28,900 कोटी रुपये आहे. अहवालात असे दिसून आले आहे की दिल्लीतील बहुतेक अतिश्रीमंतांनी ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रातून पैसा कमावला आहे.
त्यानंतर गुजरातमध्ये अतिश्रीमंतांची संख्या 110 आहे. एकत्रितपणे, त्यांच्याकडे 10,31,500 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या संपत्तीपैकी 50 टक्के संपत्ती राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्याकडे आहे. त्यानंतर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. पुढे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मिळून 105 अतिश्रीमंत लोक आहेत, तर तामिळनाडूत 103 अतिश्रीमंत आहेत. तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत लोकांची मिळून 4,53,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हे एकमेव राज्य आहे जिथे सर्वात श्रीमंत व्यक्ती एक महिला आहे. त्यानंतर केरळमध्ये 31 अतिश्रीमंत लोक राहतात. (हेही वाचा: Non Basmati White Rice निर्यात करण्यास भारताची परवानगी, 7 देशांना मिळणार 10 लाख टन तांदूळ)
अहवालानुसार, देशात 259 अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 38 अधिक आहे. श्रीमंतांच्या या यादीत बहुतेक लोक औद्योगिक उत्पादने, धातू आणि खाण क्षेत्राशी संबंधित आहेत. देशात 1 लाख कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांची संख्या गेल्या वर्षीप्रमाणे 12 आहे. अहवालानुसार, देशातील 138 शहरांमध्ये राहणाऱ्या 1,319 व्यक्तींकडे प्रत्येकी 1,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील श्रीमंतांची एकूण संपत्ती 109 लाख कोटी रुपये झाली आहे, जी सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे.