महाराष्ट्रातून महिला, मुली अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्यातील महत्त्वाची मंदिरे असलेल्या शहरांमधून बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यात यावा. तसेच, या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीचा (Human Trafficking) काही संबंध आहे का? हे देखील शोधावे, त्या दृष्टीने तपास करावा, असे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना (Human Trafficking) दिले आहेत.
मनोज सोनी नामक एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने हे आदेश दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, मनोज जोनी हे आपली पत्नी, मुले आणि कुटुंबीयांसोबत शिर्डी येथे गेले होते. दरम्यान, शिर्डी येथून सोनी यांच्या पत्नी दीप्ती गायब झाल्या आहेत. मनोज सोनी हे गेले तीन वर्षे आपल्या पत्नीचा शोध घेत आहेत. परंतू, अद्यापही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी न्यायालयात याचिका 29 ऑक्टोबरला दाखल केली आहे. याच याचिकेची दखल घेत न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना आदेश दिले आहेत. पत्नी बेपत्ता झाल्यापासून गेली 3 वर्षे आपण तिचा शोध घेत आहोत. परंतू, या काळात पोलिसांकडून आपल्याला अपेक्षीत सहकार्य मिळाले नसल्याचा आरोपही मनोज सोनी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. (हेही वाचा, धक्कादायक! शिर्डीत तब्बल 88 लोक अचानक गायब, महिलांचा जास्त समावेश; मानवी तस्करीची शंका व्यक्त करत कोर्टाने दिले चौकशीचे आदेश)
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मंदिर असलेल्या शहरांतून महिला, मुली, नागरिकांचे बेपत्ता होणेय याचा संबंध मानवी तस्करी तसेच अवयव तस्करी रॅकेट सोबत आहे का? याबाबतचे गूढही उकलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
धक्कादायक असे की, 2017 ते ऑक्टोबर 2020 या काळात शिर्डी येथून 279 नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 67 जणांबाबत अद्याप कोणताही थांगपत्ता लागला नाही. यात प्रामुख्याने विवाहीत आणि अवविवाहीत महिला, मुली आदींचा समावेश आहे.