एका वर्षात शिर्डी (Shirdi) येथून तब्बल 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांपैकी काही लोक सापडले आहे, मात्र बाकीचे अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतेक स्त्रिया असून, शिर्डी येथे दर्शनासाठी आल्यानंतर त्या गायब झाल्या आहेत. या गंभीर गोष्टीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने, पोलिसांना या प्रकरणात मानवी किंवा मानवी अवयव तस्करीच्या (Human Trafficking) दृष्टीकोनातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती टीव्ही नलावडे आणि एसएम गव्हाणे यांच्या खंडपीठाने, गेल्या महिन्यात मनोज कुमार यांच्या वतीने सन 2018 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मागच्या महिन्यात हा आदेश दिला होता.
2017 मध्ये मनोजची पत्नी शिर्डी येथून बेपत्ता झाली होती. अशीच अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, एका वर्षात 88 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. त्यातील बहुतेक स्त्रिया आहेत. एखादा गरीब जेव्हा बेपत्ता होतो, तेव्हा त्याचे कुटुंब असहाय्य होते. बहुतेक लोक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत आणि कोर्टापर्यंत ही प्रकरणे पोहचत नाहीत. म्हणूनच शिर्डीमधील या प्रकरणाबाबत मानव आणि मानवी अवयव तस्करीच्या दृष्टीकोनातून पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (हेही वाचा: खोटी लग्न लावून तब्बल 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री; वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त)
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना विशेष युनिट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. देशभरातून येथे विविध समाजातील, जाती पंथातील लोक इथे दर्शनासाठी येतात. शिर्डी हे देशातील एक सर्वात समृद्ध मंदिर आहे, परदेशातूनही हजारो भक्त इथे येतात. मात्र इथून 88 लोक गायब झाल्याने भाविकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.