Dharashiv Police Rescued Laborers: पूरोगामी आणि प्रगतीशील महाराष्ट्रात मानवी तस्करी होत असेल यावर सामान्य माणसाचा विश्वास बसणे तसे कठीणच. पण असे घडले आहे खरे. होय, महाराष्ट्रातील धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यात मानवी तस्करी (Human Trafficking) झाल्याची घटना पुढे आली आहे. रेल्वे स्टेशनवर अलेल्या पीडित आणि एकाकी, हताश पुरुषांना गाठायचे. त्यांना बक्कळ मजुरीचे आमीष दाखवायचे आणि त्यांना मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढून गुलामीसदृश्य मजूरीला जुंपायचे. असाच काहीसा प्रकार पुढे आला आहे. धाराशीव जिल्ह्यातून तस्करी (Human Trafficking in Dharashiv) झालेल्या तब्बल 11 मजूरांची ढोकी पोलिसांनी सूटका केली आहे. या घटनेनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील दलालांमार्फत वाशिम, औरंगाबाद, हिंगोली, जालना, मध्य प्रदेश, नांदेड, बुलढाणा येथील मजुरांची विक्री झाल्याची घटनाही पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे या मजुरांची केवळ दोन ते चार हजार रुपयांना विक्री केली जात असे.
पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, मजुरांची खरेदी झाली की गुत्तेदार त्यांच्याशी अमानुषपणे वागायचा. गुत्तेदार विविध ठिकाणी विहीरीची कामे घ्यायचा. या मजूरांना खोदकामासाठी विहीरीत सोडले जायचे. या मजूरांना एकदा का सकाळी विहीरीत सोडले की, थेट संध्याकाळीच बाहेर काढले जायचे. दिवसभर हे मजूर विहीरीत असायचे. त्यांचे जेवण, नाश्ता, संडास, लगवी सगळे विहीरीतच होत असे. संध्याकाळी अंधार पडायच्या वेळी या मजूरांना बाहेर काढले जायचे. बाहेर आले की त्यांना जेवण दिले जायचे. जेवले की त्यांना दारु पाजून संभ्रमीत केले जायचे.
दारुची नशा चढली की हे मजूर रात्री झोपी जायचे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठवून त्यांना पुन्हा कामाला जुंपले जायचे. या मजूरांचा हा दिनक्रम नित्याचाच होऊन बसला होता. जर एखाद्या मजूराने विरोध केलाच तर त्याला लोखंडी पाईप अथवा मिळेल त्या वस्तूने बेदम मारले जायचे. दरम्यान, गुत्तेदाराच्या तावडीतून एक मजूर पळून गेला आणि त्याने गावी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या मजूरांसोबत घडत असलेले कृत्य आणि गुत्तेदारांच्या कृत्याचा भांडाफोड झाला. (हेही वाचा, Rajasthan: सात वर्षाच्या मुलीची 38 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्नासाठी 4.5 लाख रुपयांन विक्री, राजस्थान राज्यातील घटना)
पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, कृष्णा बाळु शिंदे, संतोष शिवाजी जाधव आणि आणखी दोघे गुत्तेदार म्हणून काम करायचे. मटा ऑनलाईनने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, गुत्तेदार आणि त्यांचे काही लोक अहमदनगर, औरंगाबाद आदी स्टेशनवर पाळत ठेऊन असायचे. कोणी पुरुष एकटा, आडलेला, घरातील कटकटीला वैतागून बाहेर आलेला असेल आणि निवारा व कामाच्या शोधात असेल तर त्याला गाठायचे. मजुरी आणि निवासाचे आमीष दाखवायचे आणि त्याला जाळ्यात ओढायचे. पुढे त्याची मानवी तस्करी करायची, असा प्रकार चालत असे.