पुण्यात कॅम्प परिसरात 'ऑनर किलिंग'चा थरार; बहिणीच्या नवऱ्याचा भावाकडून चाकूने वार करून खून
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Flickr,Maarten Van Damme)

दिल्ली त्यानंतर हैद्राबाद येथे घडलेली ऑनर किलिंग (Honour Killing)ची घटना अजून ताजी असताना, सैराट चित्रपटामध्ये दर्शवण्यात आलेल्या वास्तवाची पुनरावृत्ती पुण्यात घडली आहे. बहिणीने प्रेमविवाह केला हा राग मनात धरून भावाने बहिणीच्या नवऱ्याचा खून केला आहे. पुण्यातील कॅम्प (Camp) परिसरातील मार्झा-ओ-रिन बेकरीजवळ शनिवारी रात्री सातच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. सुलतान महमंद हुसेन सय्यद (वय 24, रा. महंमदवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस या प्रकारचा पुढील तपास करीत आहेत.

सुलतान सय्यद हा तरुण हडपसर येथील महंमदवाडी येथे राहतो. 1 वर्षांपूर्वी त्याच्या प्रेम विवाह अरबाज कुरेशी याच्या बहिणीसोबत झाला. मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. याबाबत नेहमी दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले आहेत. सुलतानचा कॅम्प परिसरात नारळाचा व्यवसाय आहे. काल संध्याकाळी अरबाझ आपल्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. सुलतान आणि अरबाझ यांच्यामध्ये परत वाद झाले. हे वाद एवढे विकोपाला गेले की, अरबाज व त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर रॅम्बो चाकूने सपासप वार केले. (हेही वाचा: गर्भवती पत्नीसमोरच पतीची हत्या; आंतरजातीय विवाहाच्या रागातून कृत्य केल्याचा संशय)

वार करून हे आरोपी पसार झाले. यामध्ये सुलतान गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जवळच्या हॉस्पीटलमध्ये नेले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती, तसेच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा समाजातून निषेध केला जात आहे.