प्रणव कुमार आणि अमृता वार्षिणी (संपादित प्रतिमा, Photo Credits: ANI)

हैदराबाद: तेलंगनातील नालगोंडा येथे झालेल्या ऑनर किलिंग प्रकरणाचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी सुभाष शर्मा नावाच्या एका सुपारीबाज गुंडाला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. तेलंगणामध्ये प्रणय कुमार या २३ वर्षीय तरुणाला त्याच्या गर्भवती पत्नीसमोरच ठार मारण्यात आले होते. या प्रकरणाचे धागेदोरे ऑनर किलिंगशी जुळत होते.

दरम्यान, हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस आरोपींच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी आरोपींचा छडा लावलाच. या प्रकरणाचा तपास करत तेलंगना पोलीस बिहारमधील समस्तीपूर येथे पोहोचले आणि जगतसिंहपूर येथून सुपारी किलर सुभाष शर्मा याला तब्यात घेतले. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या हत्या प्रकरणात ८ ते १० लोकांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, प्रणय कुमारची हत्या केली तेव्हा तो आपल्या २१ वर्षीय पत्नी अमृता वार्षिणी हिच्यासोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडत होता. या दरम्यानच प्रणय कुमारची हत्या करण्यात आली. अमृताने सांगितले की, एका व्यक्तिने प्रणय कुमारवर कऱ्हाडीने पाठीमागून हल्ला केला. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती देताना अमृताने , प्रणय हा दुसऱ्या जातीचा होता. मी त्याच्याशी लग्न केले होते. हा राग मनात धरून माझे वडील आणि काका यांनीच प्रणयची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.