शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळीसोबत अजून एक मुद्दा गाजत आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास (History of Shivaji Maharaj). विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (International Education Board) स्थापना झाली. मात्र या मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच काढून टाकला आहे. ही बातमी पेपरमध्ये चापून आल्यावर त्यावर बरीच टीका झाली. अनेक नेत्यांनीही याबाबतचा आपला राग व्यक्त केला. त्यानंतर आता राज्याच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाकडून याबाबत स्पष्टीकरण देत, इयत्ता सहावीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या ढंगात आणि नव्या अंगाने समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेले कित्येक वर्षे इयता चौथीच्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जात आहे. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना हा इतिहास बदलला जाणार नाही असा ठरावही विधिमंडळात मंजूर झाला आहे. मात्र आता शिक्षण मंडळाच्या आंतरराष्ट्रीय मंडळाने चौथीच्या पुस्तकातून हा इतिहास काढून टाकला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीमधून हा इतिहास पुसण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे. यावर अनेक नेत्यांनीही विविध माध्यमातून टीका केली होती. मात्र आता मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (हेही वाचा: शिवाजी महाराज यांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून हटवण्याच्या निर्णयावरून भडकले छत्रपती संभाजीराजे; ट्वीटरवर व्यक्त केला निषेध)

शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना यासोबतच त्यांची आदर्श प्रशासन व्यवस्था आता सहावीच्या पुस्तकामध्ये मांडण्यात येणार आहे. यासोबतच शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी पैलू, महाराष्ट्रातील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील राजसत्ता, छत्रपती शिवरायांचे कार्य, त्यांचे प्रशासन, तत्वे, नीती आणि आदर्श शिवचरित्र अशा अनेक गोष्टी या सहावीच्या पुस्तकामध्ये असणार आहेत. अशाप्रकारे पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, 1970 मध्ये इयत्ता चौथीचा इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी इतर इयत्तांचे अभ्यासक्रम बदलले मात्र काही ठराविक बदल सोडता चौथीचे पुस्तक तसेच ठेवण्यात आले होते. आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने यावर्षी यात बदल केले आहेत.