
पुण्याच्या (Pune) हिंजवडी भागामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर (Tempo Traveler) ला आग लागल्याने 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिस तपासात यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्व वैमनस्यामधून टेम्पो च्या चालकानेच आग लावून 4 कर्मचार्यांना जाळून ठार मारल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चालक अटकेत आहे.
नेमकं काय घडलं?
व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 14 कर्मचार्यांना घेऊन जाणार्या टेम्पोला बुधवार 19 मार्च दिवशी सकाळी आग लागली. चालकाच्या पायाखाली आग लागली आणि चालक तसेच पुढील काही कर्मचारी तातडीने खाली उतरले पण मागचं दार न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला.
पोलिस तपासामध्ये ही आग लागली नाही तर लावली गेली असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चालक जनार्दन हंबर्डेकर याने benzene केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीटखाली ठेवलं. कापडाच्या चिंध्याही ठेवल्या. प्लॅन करुन त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला. benzene केमिकल मुळे आग बघता बघता भडकली.
का घडवून आणला घातपात?
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी जुना वाद होता. त्याचा पगार मिळाला नव्हता. त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीची कामे दिली जात होती. यामधून त्याचा 4 - 5 जणांवर राग होता. त्या रागातून त्याने जळीतकांड घडवून आणले आहे.
पोलिसांनी टेम्पो चालकावर चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी तर 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.