
खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांना (IT Employees) घेऊन जाणाऱ्या एका मिनी-बसला आग (Mini-Bus Fire) लागल्याने चौघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे येथील हिंजवडी आटी पार्क (Hinjewadi IT Park) परिसरात घडली. ही घटना सकाळी 7.30 च्या सुमारास आयटी पार्कच्या फेज 1 मधील हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (HIA) कार्यालयाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथीतरित्या ड्रायव्हरच्या सीटजवळ आग लागली, ज्यामुळे चालकाला गाडीतून उडी मारावी लागली आणि त्यानंतर मिनी-बस दुभाजकावर आदळली आणि अपघात घडला. दरम्यान, जखमींवर पुणे येथील रुबी हॉल क्लिनीक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बसमधून प्रवास करणारे कर्मचारी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे होते. दरम्यान, ही बस कंपनीने उपलब्ध करुन दिली होती की, कर्मचारी खासगी बसने कंपनीत निघाले होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. मृतांची ओळख पटली आहे. तर जखमींवर पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक, हिंजवडी येथे उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Pune Hinjewadi IT Park: पुण्यात अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव? हिंजवडीच्या 37 आयटी कंपन्यांनी घेतला काढता पाय, केले इतरत्र स्थलांतर)
मृत कर्मचारी:
- सुभाष भोसले
- शंकर शिंदे
- गुरुदास लोकरे
- राजू चव्हाण
जखमींवरील वैद्यकीय उपचार आणि आरोग्याबाबत माहिती
अपघातातील सर्व जखमी व्यक्तींवर हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींच्या आरोग्याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार त्यांची स्थिती खालील प्रमाणे:
- 40% भाजल्याने दोघांची प्रकृती गंभीर
- एक व्यक्ती 20% भाजला आहे
- एक पीडित 5% भाजला आहे, मात्र तो बेशुद्धावस्थेत आहे.
दरवाजे न उघडल्याने आग?
हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माहिती देताना सांगितले की, आठ प्रवासी घटनास्थळावरुन बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर चार जण गंभीर रित्याभाजले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ही आग इंजिनमध्ये बिघाडामुळे लागली असावी. बसचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे काही कर्मचारी वेळेत स्वत:चा बचाव करु शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग यशस्वीरित्या विझवली, परंतु अधिकाऱ्यांना आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.