Gunaratna Sadavarte: शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद; गुणरत्न सदावर्ते यांची सात तास चौकशी, पोलीस दलातही कारवाईचा धडाका
Gunaratna Sadavarte | (File Image)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे मुंबई येथील निवासस्थान 'सिल्वर ओक' येथे कथित एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी (10 एप्रिल) तब्बल सात तास चौकशी केली. यासोबतच मुंबई पोलीस दलामध्येही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असल्याचे समजते. प्रामुख्याने काही अधिकाऱ्यांना नीलंबीत करण्यात आले आहे. सदावर्ते यांची कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणावर पुरावे जमा करत आहेत. पवार यांच्या घरावर हल्ल्यासाठी आलेल्या एकूण आंदोलकांपैकी कटात सहभागी असलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे.

आक्रमकतेने आलेल्या आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर चपला, दगड भीरकावले. आंदोलक दाखल झाले तेव्हा पोलिसही मोठ्या प्रमाणावर उपस्थित नव्हते. दरम्यान, काही पोलीसांनी समयसूचकता दाखवत घटनास्थळावर हजेरी लावली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील खाली येऊन आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करु लागल्या. तुम्ही शांत व्हा. मी आपल्याशी बोलायला तयार आहे, असेही त्या सांगत होत्या. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी थेट आक्रमक भाष वापरत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, NCP Protest: शरद पवारांच्या घरावर हल्ल्याचा निषेध, आज राज्यभर राष्ट्रवादीकडून मोर्चे)

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर जमाव दाखल होताना त्याची खबर प्रसारमाध्यमांना लागली. मात्र, पोलिसांना या घटनेची माहिती मिळू शकली नाही. याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान, आंदोलकांच्या या प्रकाराची माहिती गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्यारेलाल राजभर यांना दुपारी 12 वाजताच मिळाली होती. मात्र, त्यांनी वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली नाही, असे विभागीय चौकशीत पुढे आले. त्यामुळे गृहमंत्रालयास अहवाल प्राप्त होताच त्यांना तातडीने निलंबीत करण्यात आले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्यारेलाल राजभर यांना निलंबीत करण्यासोबतच परीमंडळ दोनमधून योगेश कुमार यांना हटवत ती जबाबादारी नीलोत्पल यांना देण्यात आली आहे. तर नीलोत्पल यांच्याकडे असलेला गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार बाळसिंग रजपूत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक अनुप डांगे यांची नियुक्त करण्यात आली आहे. अनुप डांगे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणात जवळपास 109 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.