Nashik Godavari River (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्याचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शुक्रवारी (18 सप्टेंबर) गोदावरी नदीतील (Godavari River) पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नांदेड मधील 337 गावांसह जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशन दिले आहेत. नांदेडमध्ये झालेल्या अतिमुसळधार पाऊस झाल्याने विविध धरणातील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अशोक चव्हाण हे नांदेडचे पालक मंत्री सुद्धा असून त्यांनी आपत्कालीन बैठकीत हे निर्देशन दिले आहेत.(Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस; काही ठिकाणी पूरस्थिती)

तेलंगणामधील पोचंमपाड प्रकल्प पूर्णपणे भरला असून जायकवाडी आणि मजलगाव धरण सुद्धा भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठवाड्यातील धरणांतून पाणी सोडले जात आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. त्याचसोबत स्थानिक प्रशासनाने सखोल भागात पाणी साठणाऱ्या रस्त्यांबद्दल सुद्धा माहिती घ्यावी असे चव्हाण यांनी म्हटले आहे.(Maharashtra Monsoon Update: लातूर, परभणीसह मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात पुढील 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता- IMD)

तेलंगणा मधील पोचंपाड प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास नांदेड मधील 337 गावांना त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे त्यांनी सतर्क रहावे. अशोक चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे निर्देशन दिले असून त्यावेळी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते. विविध प्रकल्पाअंतर्गत गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग 1,48,000 क्युसेक पर्यंत केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जायकवाडी धरणातून सुद्धा एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. मजलगाव येथून 40,000 क्युसेक, येलद्री धरणातून 6,000 क्युसेक आणि मसोली मध्यम प्रकल्पातून 2,000 क्युसेकच्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जवळजवळ दोन लाख क्युसेक पाणी सोडले जात असल्याचे बैठकीवेळी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.