महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या पावसाने आता परतीचा मार्ग अवलंबला आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. राज्यात कोकण, मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता आज मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांची पातळी वाढली व त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे अनेक घरांचे, पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात काल पासून जोरदार पाऊस सुरु आहे. परभणीमध्ये आज सलग तिसऱ्या दिवस मोठा पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातही मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातही गेले दोन मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे सोनगाव रोडवर असलेल्या गोमती नदीला पूर आल्यामुळे, पर्यायी उभारलेल्या पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने, मागील काही तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यातही आज दुपारी पावसाने हजेरी लावली होती.
(हेही वाचा: मराठवाडा, पश्चिम विदर्भ मध्ये 24 तासांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता)
जालना जिल्ह्यात जालना, बदनापूर आणि अंबड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका आणि दुधना या नद्यांना मोठा पूर आला आहे. यासह बीड जिल्ह्यात धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातले मोठे प्रकल्प, तसेच मध्यम परंतु बीड शहरास पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. आता कोकण, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.