
समलैंगिक (Gay) तरुणांना भेटण्यासाठी एकांतात बोलावून त्यांना लूटणाऱ्या एका टोळीचा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये अनेक सुशीक्षीत तरुण असल्याचा धक्कादायक प्रकारही पुडे येत आहे. प्राप्त माहितीनुसार, ही टोळी समलैंगिकांसाठी असलेल्या डेटिंग ॲपवर (Gay Dating App) बनावट प्रोफाइल तयार करत असे. त्यातूनच ते या ॲपवर असलेल्या इतर तरुणांना समलैंगिक संबंधांचे आमिष दखवून जाळ्यात ओढत. सावज हाताला लागले की, ते त्यास एकांतात भेटण्यास बोलवत आणि मग तिथून पुढे सुरु होई लुटमार आणि फसवणुकीचा (Gay Dating Scams) प्रकार. दौलताबाद येथील तरुणासोबत असाच प्रकार घडल्यानंतर त्याने धाडस दाखवत पोलिसांशी संपर्क केल्यामुळे या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
प्रतिमा जपण्यासाठी वाच्यता नाही
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सक्रीय असेलली एक टोळी पाठिमागील अनेक दिवसांपासून समलैंगिक तरुणांची फसवणूक करत असे. ही टोळी या तरुणांना समलैंगिकांसाठी असलेल्या डेटिंग ॲपवर (Gay Dating App) वर बनावट प्रोफाईल बनवून जाळ्यात ओढत असे. त्यांना एकांतात बोलवून फसवत असे. मामला सामाजिक प्रतिमेशी निगडीत असल्याने अनेक तरुणांची फसवणूक झाली तरी, त्याची वाच्यता होत नसे. कोणी पुढे येऊन बोलावयास धजत नसे. (हेही वाचा, Pune Gay Man Looted: समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक)
काय घडले नेमके?
दौलताबाद येथील हॉटेल व्यवसायिक असलेल्या एका तरुणास 16 मे रोजी फेसबुकवर समलैंगिक डेटिंगसाठीच्या 'वॉल ॲप'ची जाहीरात दिसली. या तरुणाने प्रतिसाद देताच टोळीतील व्यक्तीने आपणही याच शहरातील असल्याचे सांगितले. दोघांमध्ये संवाद झाला आणि त्यांनी हॉटेल व्यवसायिक तरुणास शहरातील एका ठिकाणी भेटण्यास बोलावले. त्यानुसार हा तरुण दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास शहरानजीक तीसगाव फाट्यावर भेटायला गेला. तिथे त्यास दोन व्यक्ती भेटल्या. त्यांनी या तरुणास करोडी टोलनाका परिसरात नेले. दरम्यान, तिथे आणखी दोन तरुण आले. जे तरुणास निमंत्रण देणाऱ्या दोन व्यक्तींचेच साथीदार होते. या चौघांनी तरुणास पैसे आणि इतर बाबींची मागणी केली. तरुणाने विरोध करताच त्यांनी व्हिडिओ चित्रिकरण सुरु केले आणि 'तू समलैंगिक आहेस हे सोशल मीडियावर व्हायरल करतो' अशी धमकी दिली. तरीही हा तरुण बधत नाही म्हटल्यावर त्यांनी या तरुणास मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या टोळीने या तरुणाचा पिच्छा सोडला नाही. टोळीने तरुणावर इतका दबाव टाकला की, आपला अपघात झाल्याचा बनाव रचून कुटुंबीयांकडून पैसे माग असेही त्यास सांगितले. तरुणाने घरच्यांकडून पैसे घेतले. ते पैसे जवळच्या पेट्रोल पंपावरुन रोख रखमेच्या स्वरुपात काढून घेत टोळीने तरुणाला तिथेच सोडले आणि पलायन केले. (हेही वाचा, Gay Serial Killer Confessions: भावनिक आघात, लैंगिक ओळख आणि हत्यांची मालिका; गे सिरीयल किलरचा धक्कादायक कबुलीजबाब)
टोळीतील तिघे जेरबंद
घडल्या प्रकारानंतर तरुणाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी प्राप्त माहितीवरुन केलेल्या तपासानंतर तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणांनी आतापर्यंत 10 जणांना फसवल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपींच्या घरावर धाड टाकत राहुल राजू खांडेकर (20), आयुष संजय लाटे (21) आणि शिवम सुरेश पवार (24, तिघेही रा. वडगाव कोल्हाटी) यांना अटक केली आहे. प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. चौकशीत आणखी काही माहिती आणि तपशील हाती लागण्याची शक्यता आहे.