मुंबई: गेटवे ऑफ इंडिया 1 ते 4 डिसेंबर पर्यंत राहणार बंद; समुद्रमार्गे जाणा-या 'या' बोटींच्या फे-या रद्द
UberBOAT From Gateway Of India (Photo Credits: Pixabay)

मुंबईचे प्रवेशद्वार आणि मुंबईकरांची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेले गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India) रविवारपासून पुढील 4 दिवस बंद राहणार आहे. या दिवसांत भारतीय नौदलाचा विशेष कार्यक्रम होणार असल्यामुळे 1 ते 4 डिसेंबर दरम्यान गेटवे ऑफ इंडिया बंद राहणार आहे. सुट्टीचा दिवस नसला तरीही डिसेंबर महिन्यात लाँच फेरीने अलिबागला जाणारे तसेच एलिफंटाला जाणा-या लोकांची चांगलीच गोची होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गेटवे ऑफ इंडिया बंद राहणार असल्याकारणाने अनेकांची निराशा झाली आहे.

4 डिसेंबरला नौदल दिनाच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडिया परिसरात 'बिटिंग द रीट्रीट' या कार्यक्रमाचा सराव होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रम हा नौदल दिनी संध्याकाळी होईल. त्याआधी तीन दिवस म्हणजेच 1 ते 3 डिसेंबरदरम्यान नौदलाचा दुपारी 4.30 वाजल्यापासून सराव असणार आहे. या सरावासाठी सर्वसामान्य नागरिक, पर्यटकांना 'गेट वे' येथील द्वार तसेच अन्य परिसरात मज्जाव असेल. 'गेट वे' वरून मांडवा तसेच एलिफंटासाठी लॉन्च आणि बोटी सुटतात. या बोटी 1 ते 4 डिसेंबरदरम्यान तेथून सुटणार नाहीत.

हेदेखील वाचा-Gateway of India ला 94 वर्षे पूर्ण, जाणून घ्या या वास्तूबद्दल काही रंजक गोष्टी

काही ऑपरेटर्स भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून या बोटी सोडू शकतात, असे मुंबई पोर्ट ट्रस्टने स्पष्ट केले आहे. पण भाऊच्या धक्क्यावर मासेविक्री होत असल्याने तेथे मच्छिमा-यांची आणि ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. त्यातच आता 1 ते 4 डिसेंबवर दरम्यान तर बोटीही तिथेच सुटू लागल्या तर तेथे खूपच वर्दळ पाहायला मिळणार असून नागरिकांनी नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

नौदल दिनाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम फारच खास आणि आकर्षक असणार आहे. तसेच यात 3 दिवस ठेवण्यात आलेला नौदलाचा ठरावही विशेष ठरणार आहे.