Mumbai: मुंबईमध्ये एका 22 वर्षीय महिलेला पेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, मित्राने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये तिला गुंगीचं औषध देण्यात आलं. 8 नोव्हेंबर 2020 रोजी तक्रारदार महिला आपल्या मित्रांसोबत एका पार्टीमध्ये गेली होती. ही पार्टी अंधेरीतील तिच्या मित्राच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. यावेळी तिच्या पेयात आरोपींनी गुंगीचे औषध दिलं. त्यानंतर तक्रारदार महिलेने हे पेय पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार याअगोदर भायखळा पोलीस ठाण्यात केली होती. परंतु, ही घटना अंधेरी परिसरात घडल्यामुळे ही तक्रार सहार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर पीडितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - Pune Rape: प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना)
दरम्यान, औरंगाबादमध्ये बलात्काराची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत आरोपींनी पीडितेच्या ओठांचा चावा घेतला. यात पीडितेचा ओठ तुटला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.