COVID 19 Test | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोकण आणि गणेशोत्सव हे अगदीचं जिव्हाळ्याचं नातं आहे. अवघ्या काही दिवसांवर यंदाचा गणेशोत्सव येऊन ठेपल्याने आता चाकरमान्यांची गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi) कोकणात जाण्याची रीघ वाढली आहे. यंदा गणेश चतुर्थीवर कोरोनाचं सावट असल्याने तसेच तिसर्‍या लाटेचा धोका कायम असल्याने प्रशासन अलर्ट मोड वर राहून काम काम करत आहे. शासन नियमावलीनुसार आज (5 सप्टेंबर) पासून कोकणात जाणार्‍यांना कोरोना चाचणीला (COVID Test) सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान ज्यांनी कोविड 19 चे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत त्यांची यामधून सुटका आहे.

राज्य सरकारच्या नियमांनुसार, जर तुम्ही कोविड 19 चे दोन्ही डोस घेतले नसतील किंवा कोकणात प्रवेश करण्यापूर्वी किमान 72 तास आधीचा तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह नसेल तर गावात प्रवेशापूर्वी तुम्हांला कोविड टेस्ट करावी लागणार आहे. यासाठी एसटी, रेल्वे स्थानकाबाहेर आणि गावगावात कोरोना चाचणी बंधनकारक केलेली आहे. आजपासून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, गुजरात मधून कोकणात दाखल होणार्‍यांवर रेल्वे, एसटी तसेच जलमार्गावर प्रशासन तयारीत आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2021: कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमात मुभा द्या अन्यथा 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा.

कोकणात एसटी मार्गे येणार्‍या प्रवशांची माहिती चालक-वाहक एसटी आगारात जमा करणार आहेत. ही माहिती तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. यंदा रेल्वे प्रशासनाने देखील चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकच्या रेल्वे फेर्‍या, गणपती विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनावश्यक गर्दी रोखण्यास मदत होणार आहे. तसेच रेल्वे प्रवास हा केवळ आरक्षित प्रवाशांसाठी असेल त्यादरम्यानही कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.