यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2019) अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना मुंबईच्या चाकरमान्यांना आता कोकणात गावी जाण्याचे वेध लागले असतील. या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठा भार येत असल्याने अनेक नागरिक रस्ते मार्गाने वाहतुकीचा पर्याय निवडतात. अशा प्रवाशांसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक आनंदवार्ता दिली आहे. यानुसार गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-कोल्हापूर (Mumbai - Kolhapur) मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभाग सचिव अजित सगणे व अन्य संबंधित अधिकार उपस्थित होते.गणेश चतुर्थी निमित्त कोकणवासियांसाठी ‘पश्चिम रेल्वे’च्या स्पेशल ट्रेन्स; पहा वेळापत्रक
दरवर्षी मुंबई- कोल्हापूर मार्गाने कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. मात्र यंदा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या अवस्थेचा फटका नागिरकांना बसू नये म्हणून आवश्यक उपाययोजनांचा व रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. यांनतर काही ठिकाणी रस्ते दुरूस्तीची सुरू असलेली कामे लवकर संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच तसेच मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचेही काम जलदगतीने सुरू आहे.
दरम्यान, कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे व बस सेवेतही शासनाने अधिक सुविधा देऊ केल्या आहेत. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने सुमारे 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोकण रेल्वे तर्फे देखील अधिक कोचेस व गाड्यांची सुविधा तयार केली आहे.