Ganeshotsav 2019: मंडळांना ऑनलाईन परवानगी घेण्याची सुविधा, 19 ऑगस्ट पर्यंत 'या' संकेतस्थळावर करता येणार अर्ज
Ganpati Utsav (Photo Credits: PTI)

मान्सूनच्या (Monsoon)आगमनासोबतच वेध लागतात ते गणेशोत्सवाचे (Ganeshotsav). यावर्षी 2 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणपतची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मागच्या वर्षीपासून मुंबई शहर व उपनगरातील गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेण्यासाठी महापालिकेने (BMC) ऑनलाईन सेवा सुरु केली. आता यावर्षीदेखील ऑनलाईन परवानगी घेण्यासाठी 19 ऑगस्ट सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी मंडळांना www. mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमधून अर्ज करण्याची सुविधा असणार आहे.

राज्यात पुणे आणि मुंबई याठिकाणी गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष दिसून येतो. त्यात मुंबई शहरात जवळजवळ 12 हजार लहान-मोठी मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळांना परवानगी देण्यासाठी गेल्यावर्षी पासून ‘एक खिडकी’ योजना सुरु केली. मात्र गेल्यावर्षी ऑनलाईन अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. हीच समस्या ओळखून यावर्षी ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. यासाठी मंडळे 19 ऑगस्टपर्यंत आर्ज करू शकतात.

दरम्यान, बाहेरून मूर्ती आणून विकणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेकडून परवानगी मिळणार नाही. मंडप बांधण्याची परवानगी फक्त स्वतः मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांनाच देण्यात येईल. ही परवानगी विभाग कार्यालयाकडून ऑफलाइन पद्धतीनेच देण्यात येईल. परवानगी घेतल्यानंतर तो अर्ज पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडे ऑनलाईन सदर केला जाणार आहे, त्यामुळे त्यांची स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज नाही.