राज्यात अकरावी प्रवेशासाठी (FYJC Admission) अद्याप दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीतर तर प्रवेशाच्या यादीत नाव न आल्याने काही विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकलेला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएस (FCFS) म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीला मान्यता देण्यात आली आहे. आजपासून या फेरीला सुरुवात होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या फेरीचा लाभ घेत अकरावीत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आलं आहे.
आजपासून (मंगळवार, 28 सप्टेंबर) पासून सुरु होणारी ही फेरी 13 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. या फेरीची सात टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. या अंतर्गत रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करुन विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती करता येणार आहे. कसे असतील या फेरीचे सात टप्पे? जाणून घेऊया... (FYJC Admission 2021-22: विद्यार्थ्यांना POEAM App च्या माध्यमातून इयत्ता अकरावीत घरबसल्या प्रवेश)
पहिला टप्पा:
28 ते 29 सप्टेंबर दरम्यान होणार असून हा 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांसाठी असेल.
दुसरा टप्पा:
हा टप्पा 80 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांसाठी 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होईल.
तिसरा टप्पा:
70 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांकरता 2 ते 4 ऑक्टोबर या काळात होईल.
चौथा टप्पा:
हा टप्पा 5 ते 6 ऑक्टोबर दरम्यान 60 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.
पाचवा टप्पा:
हा टप्पा 50 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांसाठी असून 7 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
सहावा टप्पा:
दहावी पास होऊन प्रवेशास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा टप्पा असेल. 10 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत हा टप्पा पार पडणार आहे.
सातवा टप्पा:
हा शेवटचा टप्पा 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान एटीकेटी आणि दहावी उत्तीर्ण अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी पार पडेल.
यापूर्वी विशेष फेरीच्या अखेर अमरावती विभागात 8957, मुंबई विभागात 1,84,701, नागपूर विभागात 28,934, नाशिक विभागात 16,545 तर पुणे विभागात 60,878 प्रवेश झाले आहेत. अद्यापही 2 लाख 34 हजार जागा रिक्त असून एफसीएफएस फेरीत या जागांवर प्रवेश घेण्यात येणार आहेत. दरम्यान, यंदा कोविड-19 संकटामुळे दहावीच्या परीक्षा रद्द होऊन अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आले. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल सर्वाधिक लागला आहे.