राज्याच्या राजकारणात आता आणखी एका राजकीय पक्षाची भर पडली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’असे या पक्षाचे नाव असून, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा पक्ष स्थापन झाला. रायरेश्वराच्या मंदिरात या पक्षाची स्थापना झाल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विविध मागण्यांना न्याय देण्यासाठी आणि या मागण्या लाऊन धरण्यासाठी या पक्षाची स्थापना झाल्याचे सांगितले जात आहे.
आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यभर शांतता मोर्चे काढले. अत्यंत शिस्तबद्ध आणि तितक्या आक्रमकपणे काढलेले लोकशातील सर्वात मोठे मोर्चे अशी या मोर्चांची नोंद झाली. मात्र, इतके होऊनही सरकारला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्षच स्थापन करावा का? याबात मराठा समाजातील काही मंडळींकडून विचार सुरु होता.
दरम्यान, कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून पक्ष स्थापनेसंदर्भात मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात भविष्यात अशा पक्षाची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याची स्थापना व्हावी असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याच मेळाव्यात दिवाळीचा मुहूर्त साधून रायरेश्वराच्या मंदिरात या नव्या पक्षाची स्थापना केली जाईल अशी माहिती सूत्रांनी त्या वेळी दिली होती. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचा नवा पक्ष, दिवाळीच्या मुहूर्तावर घोषणा)
दरम्यान, मराठा समाजाकडून आत्तापर्यंत ५८ मूक मोर्चे काढण्यात आले. , मात्र यातून काहीच साध्य झाले नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पक्षात मराठा नेते असूनही काहीच फायदा झाला नाही. म्हणूनच नवीन पक्षाकडून राज्यभर दौरा करून मराठा समाजबांधव व संघटनांशी चर्चा करुन पक्ष स्थापन करावा, अशी समाजातील एका मोठ्या वर्गाची मागमी होती. त्यानुसार हा पक्ष अस्तित्वात आल्याची चर्चा आहे.