Free Health Check-up: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, तपासणी मोफत; वयोगट, खर्चमर्यादा घ्या जाणून
Rajesh Tope | (Photo Credit: Facebook)

राज्य सरकारच्या (Maharashtra Governmen) आरोग्य विभागात (Health Department) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता आरोग्य तपासणी (Free Health Check-up) मोफत केली जाणार आहे. राज्य मंत्रिंडळाच्या आज (31 मार्च) हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागात काम करणाऱ्या 40 ते 50 या वयोगटातील कर्मचाऱ्यांना रुपये 5 हजार इतक्या खर्च मर्यादेत बसणाऱ्या सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून एक वेळ मोफत करता येणार आहेत. तर याच आरोग्य तपासण्या इतक्याच खर्च मर्यादेत वय वर्षे 51 ते 60 असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून प्रत्येक महिन्याला म्हणजेच 12 वेळा करता येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती देताना सांगितले की, राज्य सरकारने कोरोना महामारी नियंत्रणासाठी घातलेले सर्व निर्णय हटवले (Maharashtra Coronavirus Restriction Free) आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र मास्कमुक्तही झाला आहे. ज्या नागरिकांना मास्क वापरावा असे वाटते त्यांनी वपरावा. ज्यांना नाही वाटत त्यांनी वापरु नये. मास्क वापरण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी ऐच्छिक आहे. (हेही वाचा, Maharashtra Coronavirus Restriction Free: महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय)

राज्यातील निर्बंध हटविल्यामुळे यापुढे साजरे होणारे सर्व सण, उत्सव नागरिकांना मोठ्या उत्साहात साजरे करता येणार आहेत. मग तो सण गुढी पाढवा असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती. राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. त्यामुळे आता निर्बंध कायम ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले.