पावसाळा झाल्यांनतर साधारण नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये (Mumbai) परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षांचे (Flamingo Birds) आगमन होते. नवी मुंबईमधील खाडी किनारा अशा फ्लेमिंगोंच्या गुलाबी रंगांनी न्हाहून निघाला आहे. सध्या नवी मुंबईच्या (Navi Mumbai) नेरूळ (Nerul) परिसरातील एका तलावामध्ये फ्लेमिंगो पक्षांची झुंड दिसून येत आहे. हे पक्षी पाहण्यासाठी परिसरात गर्दी केली जात आहे. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन मुंबईकरांना थोडा दिलासा देणारे आहे. मुंबईचे छोटे तलाव व बेटांवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने, संपूर्ण वातावरण गुलाबी झाले आहे.
राजहंस म्हणून ओळखल्या जाणार्या या पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवी मुंबईच्या परिसरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी दाखल होतात व यंदाही त्यांचे आगमन झाले आहे. अहवालानुसार हे फ्लेमिंगो गुजरातमधील कच्छचे रण आणि राजस्थानमधील सांभर तलाव येथून येतात. काही पक्षी हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि इस्त्राईलमधून स्थलांतर करून भारतात पोहोचतात. जगात 6 जातीचे फ्लेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये सध्या लेसर आणि ग्रेटर असे दोन जातीचे फ्लेमिंगो पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा: Mumbai: धावत्या ट्रेनमधून पतीने पत्नीला ढकलले; महिन्याभरापूर्वीच झाले होते लग्न)
Maharashtra: A large number of migratory Flamingo birds flock to the lake in Nerul, Navi Mumbai. pic.twitter.com/lswgBuUf6v
— ANI (@ANI) January 13, 2021
ज्या ठिकाणी शुद्ध पाणी असते व पाण्याची पी.एच.लेव्हल संतुलित असतो तेथेच फ्लेमिंगो आढळून येतात. ठाणे व वाशी परिसरात गेले कित्येक वर्षे फ्लेमिंगोचे आगमन होत असल्याने, ठाणे आणि वाशीच्या खाडीपट्ट्यात 1,690 हेक्टरचे फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आले आहे. इथे असलेले विशिष्ट प्रकारचे शेवाळ, कोळंबी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदी मुबलक खाद्य मिळत असल्याने फ्लेमिंगोची पसंती या भागात जास्त आहे. सध्या फ्लेमिंगो पक्षांचे दर्शन हा मुंबईकरांसाठी पर्यटनाचा भाग झाला असून, त्यासाठी ठाणे व वाशी परिसरात मोठी गर्दी होत आहे.