
Thane: 38 वर्षीय डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी (Murbad Police) पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. मुरबाड पोलिसांनी सांगितले की, ही घटना गेल्या वर्षीची असून त्यांच्या पथकाने शनिवारी आरोपीला अटक केली. मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितलं की, 22 ऑक्टोबर 2022 रोजी डॉक्टर त्यांच्या स्कूटरवर जात असताना एका व्यक्तीने त्यांच्याकडून लिफ्ट घेतली.
काही अंतर पुढे गेल्यावर, आरोपीचा सहकारी तेथे आला आणि डॉक्टरांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांनी मुरबाड परिसरातील सरळगाव येथील जंगलात नेलं. तसेच डोळे झाकून मारहाण केली. (हेही वाचा - Pune: जेवणात भाकरी मिळाली नाही म्हणून मद्यधुंद महिलेचा हॉटेलमध्ये राडा, पोलिसांवरही हात उगारला)
पांढरे यांनी पुढे सांगितलं की, आरोपींनी डॉक्टरच्या पत्नीलाही फोन करून सोडण्यापूर्वी 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. घटनेच्या 25 दिवसांनंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आमच्या तपास पथकाने गुन्ह्याच्या विविध अंगांनी काम केले. आम्ही विविध मोबाईल फोनच्या 2.50 लाख डेटा डंपचे विश्लेषण केले आणि आरोपींचे टॉवर लोकेशन मिळवण्यात यशस्वी झालो.
आमच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी आरोपींचा शोध घेतला आणि शनिवारी त्यांना अटक केली. गुन्ह्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. स्थानिक न्यायालयाने आरोपींना 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पांढरे यांनी दिली.