Farmers Suicide In Maharashtra: राज्यात मागील पाच महिन्यात एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या
Farmer | Pixabay.com

महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 31 मे 2024 या कालावधीत सुमारे एक हजार 046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात प्रत्येक महिन्याला सरासरी 209 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील एकूण एक हजार 046 शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक 143 आत्महत्यांची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. दुसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा असून गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात 132 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 83 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. (हेही वाचा - Maharashtra Vidhan Parishad Election 2024: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी; दाखल केला अर्ज)

समोर आलेल्या आकडेवारीवरून दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असून सर्वाधिक आत्महत्या झालेले पहिले चार जिल्हे अमरावती विभागातील आहेत. राज्यातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास निम्म्या (461) आत्महत्या अमरावती विभागात झाल्यामुळे या विभागातील गंभीर संकट अधोरेखित होत आहे.

आकडेवारीचा विचार केल्यास कोकण विभागात पाच महिन्यांत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. पुणे विभागात 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे 8 आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. नाशिक विभागात 115 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात सर्वाधिक 76 आत्महत्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. छत्रपती संभाजी नगर विभागातही 347 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.  द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती मिळविली आहे.