Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील गजबजलेला परिसर मस्जिद बंदर (Masjid Bundar) भागातील अब्दुल रेहमान रोडवरील  (Abdul Rehman Street) व्यावसायिक इमारतीला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. Level 4 ची आग या इमारतीला लागल्याने 9 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार, अब्दुल रेहमान रोडवरील कटलरी दुकानाला ही आग लागली. हळूहळू या आगीचे प्रमाण वाढत गेले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हळूहळू या आगीचे प्रमाण वाढत जाऊन हे लोण या भागात पसरले. यामुळे या परिसरात घबराट पसरली होती. Thane Fire: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका केमिकल गोदामाला मोठी आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले असून या आगीत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र हे कटलरी दुकान असल्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel Hospital) रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात (ICU Ward) आग लागल्याची घटना घडली होती.

लॉकडाऊन मध्ये देशात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून कारखाना, दुकान, गोदामाला आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. देशात एकीकडे कोरोना व्हायरस तर दुसरीकडे सुरु असलेल्या या आगीच्या घटनामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसची देशातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. मागील 24 तासांत देशात 74,742 कोरोनाचे रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 66,23,816 वर पोहोचली आहे.