मंगळवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) लोकशाही वृत्तवाहिनीचे (Lokshahi News Channel) मुख्य संपादक कमलेश सुतार आणि युट्युबर अनिल थत्ते यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला आहे. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सहभाग असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. सोमय्या यांनी बुधवारी मुंबई पोलीस पूर्व क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नमूद केले की, किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ लोकशाही वाहिनीवर त्याचे संपादक कमलेश सुतार यांनी प्रसारित केला होता, तर अनिल थत्ते यांनी तो त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केला होता.
या व्हिडिओबाबत महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या वादानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला या व्हिडिओची चौकशी करण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
या वर्षी जुलैमध्ये, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये माजी खासदार व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह स्थितीत दिसत होते. 'लोकशाही' या मराठी वृत्तवाहिनीने यातील आक्षेपार्ह कंटेंट अस्पष्ट करून आणि संबंधित महिलेची ओळख सुरक्षित करून तो प्रसारित केला होता. लाइव्ह शोमध्ये लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी या व्हिडिओद्वारे कोणाच्याही गोपनीयतेवर आक्रमण न करण्याचा त्यांचा इरादा व्यक्त केला होता. तसेच व्हिडिओची सत्यता आणि संबंधित तक्रारींबाबत सोमय्या यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.
चॅनेलने सोमय्या सारखी व्यक्ती सामील असलेल्या या व्हिडिओबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते, जे स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचे वारंवार आरोप करतात. या व्हिडीओने स्वाभाविकपणे राज्यात राजकीय धुमाकूळ घातला होता. विरोधकांनी 'अश्लील' कृत्यांमध्ये गुंतलेल्या सोमय्या यांच्या विरोधात चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. दानवे यांनी आठ तासांहून अधिक व्हिडीओ फुटेज असलेला एक पेन ड्राईव्ह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला आणि सखोल चौकशीची मागणी केली. (हेही वाचा: Cyber Security Project: राज्यात सायबर सुरक्षेसाठी उभा राहणार 837 कोटींचा प्रकल्प; 24 तास कार्यरत कॉल सेंटर, जाणून घ्या वैशिष्ट्ये)
गृहखात्याची जबाबदारी असलेल्या फडणवीस यांनी परिस्थितीच्या गंभीरतेवर भर देत, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता व्हिडीओ आणि विरोधकांच्या आरोपांच्या चौकशीबाबत काहीही यश आले नसले तरी, ज्या चॅनलने हा व्हिडीओ प्रसारित केला ते स्कॅनरच्या कक्षेत आले आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार आणि मीडिया व्यक्तिमत्व अनिल थत्ते यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.