नागपूरच्या (Nagpur) अंभोऱ्यातील (Ambhora) वैनगंगानदीत (Vainganga River) 12 वर्षीय मुलीसह दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही हृदयद्रावक घटना रविवारी (31 जानेवारी) दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच वेलतूर पोलीस (Veltur Police) घटनास्थळी दाखल होऊन चौकशीला सुरुवात केली. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
श्याम गजानन नारनवरे (वय, 46) सविता श्याम नारनवरे (वय, 35) आणि कु. समिता समीक्षा श्याम नारनवरे (वय, 12) अशी तीनही मृतकांची नावे आहे. हे दाम्पत्य वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. शनिवारी सायंकाळी तिघे मोटरसायकलने अंभोऱ्यातील मंदिराजवळ आले. त्यानंतर त्यांनी वैनगंगा नदीत उडी घेतली. एका प्रत्यक्षदर्शीला मोटरसायकल तेथे उभी दिसली. त्याने वेलतूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तिघांचे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांचे हात एकमेकांना ओढणीने बांधले होते. हे पाहिल्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Mumbai: वरळीत 50 वर्षीय सुरक्षा रक्षकाची हत्या, पोलिसांकडून तिघांपैकी एकाला अटक
श्याम नारनवरे हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते, अशी माहिती मिळत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वेलतूर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, एकाच कुटुंबियातील तिघांनी आत्महत्या केल्याने नारनवरे कुटुंबियावर दुखाचे डोंगर कोसळले आहे.
महत्वाचे म्हणजे, लॉकडाऊनमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. या कालावधीत अनेकांना बेरोजगारी किंवा अर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. या नैराश्यातून कित्येकांनी आत्महत्या असा पर्याय निवडला आहे. यात कोरोनाच्या भितीने आत्महत्या केलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे.