#पुन्हानिवडणूक - सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव सोबत सर्व कलाकार का वापरत आहेत हा हॅशटॅग? वाचा सविस्तर
Twitter Trend (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्यात राजकीय पातळीवर रोज नव्या घडामोडी सुरु असताना, एक नवा ट्रेंड सोशल मीडियावर समोर आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असल्याने कोणत्याही पक्षाला जर सत्ता स्थापन करता आली नाही तर पुन्हा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीत मराठी कलाकार सुद्धा #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून एखादी पोस्ट लिहीत असतील तर सामान्य जनतेलाही प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की खरंच पुन्हा निवडणुका होणार का?

सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव या प्रसिद्ध मराठी कलाकारांनी #पुन्हानिवडणूक या हॅशटॅगचा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे. आणि त्यांच्या या पोस्ट पाहता अनेकांनी या सर्वाचा राजकीय परिस्थितीशी संबंध जोडला आहे.

परंतु याच कलाकारांच्या जवळील सूत्रांनी LatestLY मराठी ला दिलेल्या माहितीनुसार या हॅशटॅगमागे कोणताही राजकीय हेतू नसून या चारही कलाकारांचा एक नवा प्रोजेक्ट लवकरच येणार आहे, ज्याच्या प्रोमोशनची ही एक स्ट्रॅटेजी असल्याचे समजत आहे.

अद्याप चारही कलाकारांनी याबद्दल कोणतीही माहिती त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलद्वारे दिली नसली तरी ते लवकरच या ट्रेंडचा उलगडा करणार आहेत.

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी या हॅशटॅगचा संबंध भाजपशी जोडला आहे. असे ट्विट करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

तर काही नेटकरी मंडळींनी या ट्विट्सचा संबंध झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमाशी जोडला आहे. मात्र वाहिनीने ते फेटाळून लावले आहे.