Maharashtra Monsoon Session 2021: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी सोमवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. दरम्यान, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत आज सभागृहाबाहेर प्रतिसभागृह भरवले होते. ज्यामुळे सभागृहात तवाणपूर्णक वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कालच्या घटनेचा व्हिडीओ जर पाहिला, तर आपल्या सगळ्यांची मान शरमेने खाली जाईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी अजित पवार यांनी काल विधानसभेत घडलेल्या प्रकारावर भाष्य केले आहे. सभागृहात बाळासाहेब थोरात वरिष्ठ होते. ते 1985 मध्ये संगमनेर येथून निवडून आले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सभेतल्या सगळ्या बाबी बघितल्या आहेत. आम्हीदेखील अनेक मुख्यमंत्र्यांना सभागृहात पाहिले आहे. तसेच त्यांची कारकिर्दही बघितली आहे. आम्ही कधी सत्तेत होतो. तर, कधी विरोधात होतो. परंतु, आम्ही नेहमी सभागृहाचे पावित्र्य राखले. आम्ही विरोधी पक्षात असताना आमच्याही 19 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. आम्ही हल्लाबोल आंदोलन सुरू केले. पण कालची गोष्ट अशोभनीय होती, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- 'कालची घटना अतिशय लाजिरवाणी होती, ते पाहून मान शरमेने खाली गेली'- CM Uddhav Thackeray
निलंबित करण्यात आलेल्या 12 आमदारांमध्ये गिरीश महाजन, आशीष शेलार, संजय कुटे, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, नारायण कु चे, हरीश पिंपळे, राजकु मार रावल, राम सातपुते, योगेश सागर, पराग अळवणी आणि कीर्तिकुमार भंगाडिया यांचा समावेश आहे. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना या कालावधीत विधान भवनाच्या आवारात प्रवेशबंदी आहे.
दरम्यान, भाजपच्या निलंबित 12 आमदारांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काल भेट घेतली होती. या प्रकरणात हस्तक्षेप करावा व लोकशाहीची गळचेपी रोखावी, अशीही मागणी त्यानी केली आहे. तसेच अध्यक्षांच्या दालनात भाजपच्या आमदारांनी नव्हे, तर महाविकास आघाडीच्या आमदारांनीच धक्काबुक्की केल्याची तक्रार या आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे.