CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर ठराव आणण्यात आले. यामध्ये नवीन कृषी कायदे, ओबीसी आरक्षण, कोविड-19 लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘काल जे काही घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. आम्हाला राज्यात बदल घडवून आणण्यासाठी निवडण्यात आले आहे, मात्र काल जे काही घडले ते पाहून मान शरमेने खाली गेली आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘हे आम्ही घडवले नव्हते. विधिमंडळात ओबीसी समाजाबद्दल चर्चा होत होती, यावर सहमत व्हायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे. याविरुद्ध बोलायचा तुम्हाला अधिकार आहे, त्याला लोकशाही म्हणतात. मात्र आरडाओरडा करणे ही लोकशाही नाही, हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. भास्कर जाधव यांच्यासोबत जे काही घडले ते समोर आले आहे. परंतु त्यांनी सभागृहात त्यांच्या दालनात जे काही घडले त्याचे संपूर्ण वर्णन केले नाही. शिसारी येणारे हे वर्तन होते.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा आम्ही ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडे आवश्यक माहिती मागितली होती आणि पंतप्रधानांना त्याचे पत्र दिले होते. तो डेटा केंद्राकडे आहे. या माहितीसाठी विधानसभेत प्रस्ताव आणला जात होता, तर त्याबाबत विरोधी पक्षाला इतका राग का असावा? ओबीसी समाजाबाबत जर का इतका द्वेष मनात असेल, तर इतर मार्गांनी व्यक्त करायचा. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, ती माहिती या विरोधी पक्षाला कशी मिळाले?’ (हेही वाचा: विधिमंडळ परिसरात भाजपची प्रतिविधानसभा, सत्ताधारी आमदार आक्रमक; विधानसभा आध्यक्षांच्या आदेशाने कारवाई)

ते पुढे म्हणाले की, ‘दोन दिवसांमध्ये आम्ही बरेच काम केले आहे. यामुळे जनतेला नक्कीच आनंद व समाधान मिळेल. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीसाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागणार आहे, मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे ही निवडणूक सध्या तरी होणे शक्य नाही असे राज्यपालांना कळवण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर सगळी खबरदारी घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल.’