Pune: गुंगीचे औषध देऊन वृद्ध महिलेकडून 8 लाख लुटले, घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Robbery (Representative Image- File)

पुण्यातील (Pune) गुन्हेगारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यातच पुणे जिल्ह्याच्या कल्याणीनगर (Kalyani Nagar) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. या परिसरातील इंद्राप्रस्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला (वय, 73) गुंगीचे औषध देऊन घरकाम करणाऱ्या महिलेने 8 लाख रुपये लुटल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी वृद्ध महिलेने आरोपी महिलेविरोधात येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

फिर्यादी महिला वृद्ध असून तिला रक्तदाब, मधुमेहाचा आजार होता. ज्यामुळे घरातील काम करण्यासाठी त्यांनी एका महिलेला कामाला ठेवले होते. संबंधित महिला 27 जूनपासून वृद्ध महिलेच्या येथे काम करण्यास येऊ लागली. त्याचवेळी या महिलेने संपूर्ण घराची व्यवस्थित माहिती घेतली. त्यानंतर 29 जून रोजी वृद्ध महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. ज्यामुळे वृद्ध महिला बेशुद्ध झाली. यानंतर या महिलेने वृद्ध महिलेच्या घरातील कपाटातून चार हजार रुपयांची रोकड आणि 8 लाख किंमतीचे दागिने लंपास केले. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार वृद्ध महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर तिने येरवडा पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात फिर्याद दिली आहे. हे देखील वाचा- Thane: मोबाईल घेण्याच्या बहाण्याने लंपास केले दोन महागडे मोबाईल; घटना सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, पंजाबमधील लुधियाना येथे काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना  घडली  होती. या ठिकाणी एकटीच राहत असलेल्या वृद्ध महिलेला मारहाण करीत शेजारी राहणाऱ्या जोडप्याने तिला लुटल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.