एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच ठाण्यात 'बाळासाहेबांची शिवसेना' (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे इतर पक्षांतील नेते, आजी-माजी नगरसेवकांचे इनकमींग करण्यावर विशेष भर दिला जातो आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्यांचा, नगरसेवकांचा समावेश आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि 5 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात आज (12 फेब्रुवारी) प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशाने आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समोरील आव्हान वाढल्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्काही बसल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेतील अपवाद वगळता शिवसेनेतील जवळपास सर्वच आजी-माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे हा शिवसेनेचा सुरुवातीपासूनच बालेकिल्ला म्हणून ओळखले जात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्गही ठाण्यामध्ये आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आज सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Nana Patole On PM: नाना पटोलेंनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार, म्हणाले - संसदेत ते पान टपरीवर असल्यासारखे बोलत होते)
एकनाथ शंदे गटात प्रवेश करणाऱ्या संभाव्य नेत्यांची नावे
- हणमंत जगदाळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्ष नेते
- राधाबाई जाधवर, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
- दिगंबर ठाकूर, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
- वनिता घोगरे, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
- सुलोचना चव्हाण, माजी नगरसेविका, ठाणे मनपा
- इतर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते
कट्टर पवार समर्थकाची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
शिंदे गटात प्रवेश कणाऱ्या नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांचाही समावेश आहे. हणमंत जगदाळे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठाणे मनपा प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वच 4 माजी नगरसेवक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगितले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, आज (12 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता लक्ष्मी पार्क सर्व्हिस रोड येथील होणाऱ्या कार्यक्रमात हा प्रवेश होत आहे.