Eknath Shinde (Photo Credit: Twitter)

Eknath Shinde Not Reachable? विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तत्काळ येण्याचे आदेश जारी दिले आहेत. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने सत्ताधारी आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची जास्त मते फुटल्याने उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थावर तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत ठाकरे काहींना बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व प्रकारामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी मध्यरात्रीच वर्षा निवास्थानावर शिवसेनेच्या काही आमदारांची आणि नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू आहे. (हेही वाचा - Vidhan Parishad Election 2022: विधानपरिषद निवडणुकीमध्ये BJP ला पाचही जागांवर यश; महाविकास आघाडीला मोठा धक्का, जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी)

मुख्यमंत्री आज शिवसेना आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले आहेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली आहेत. त्यामुळे आता शिवसेनेतच फूट पडणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.